Step into an infinite world of stories
4.4
Biographies
माझ्या कुंडलीत ज्योतिष्यांना न दिसणारा एक फार मोठा भाग्ययोग आहे. मला प्रत्यक्ष किंवा असामान्य कर्तृत्वाच्या रूपाने अप्रत्यक्ष भेटलेली माणसे हे ह्याच भाग्ययोगाचे फळ आहे. त्यांपैकी काही माणसांचे हे गुणगायन आहे. त्यांच्या गुणांची आरास माझ्या अंत:करणात सदैव मांडलेली असते. पण ज्याच्यामुळे त्यांचे स्मरण अधिक तीव्रतेने व्हावे, असेही प्रसंग येतात. कधी त्यांच्या निधनाच्या दु:खाने गळणार्या अश्रूंच्या जोडीनेच ते शब्दचित्र रेखाटले जाते, तर कधी त्यांच्या पन्नासाव्या किंवा साठाव्या वर्षगाठीच्या दिवशी त्यांना जाहीर अभिवादन करावेसे वाटते. लोहियांवरचा लेख हा त्यांच्या लेखसंग्रहाला प्रस्तावना म्हणून लिहिला गेला आहे.
मात्र हे गुणगान केवळ प्रासंगिक नाही. माझ्या मनाने लावलेल्या निकडीतून ही शब्दचित्रे तयार झाली. ह्यांतली अण्णासाहेब फडक्यांसारखी काही माणसे हयात असताना मी त्यांची शब्दमूर्ती घडवायचा प्रयत्न केला. त्यांतल्या एखाद्याच्या कलेतून, नि:स्वार्थ जगण्यातून, निरपेक्ष स्नेहातून, सुरांतून, ग्रंथांतून, गीतांतून किंवा व्यक्तिमत्त्वाच्या एखाद्या देखण्या पैलूतून मला लाभलेला आनंद जिवंत आहे. त्या अरूप आनंदाला मी रूप देण्याचा प्रयत्न केला आहे.
ह्या गुणवंतांचे स्मरण मला फार मोठी कृतार्थता देत आले आहे. अशा कृतार्थतेच्या क्षणी मी नतमस्तक होऊन अज्ञाताला विचारीत असतो, की असल्या भाग्याची या जन्मी धणी करून देणारे गतजन्मीचे ते माझे कोणते सुकृत होते ते मला सांग. ह्या जन्मी तसले काही तरी करायचा प्रयत्न करीन, म्हणजे पुढच्या जन्मीच्या ह्या असल्या भाग्ययोगाची पूर्वतयारी तरी करता येईल. - पु.ल.देशपांडे
© 2023 Storyside IN (Audiobook): 9789354833755
Release date
Audiobook: 1 April 2023
English
India